धुंडिराज गोविंद किंवा दादासाहेब फाळके या माणसाबद्दल आपल्यापैकी बहुतांश लोकांना 'भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक' आणि त्यांच्या नावाने भारत सरकारद्वारा दिला जाणारा पुरस्कार यापलीकडे फारशी माहिती नसेल. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा परेश मोकाशी यांचा सिनेमा आपल्याला 'राजा हरिश्चंद्र' या भारतातल्या पहिल्या मूकपटाच्या जन्माची कहाणी सांगतो. हा चित्रपट २००९ सालच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे पाठवण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी हा चित्रपट पहाण्याचा योग आला. कुठलाही चांगला चित्रपट पाहिल्यानंतर त्या चित्रपटामागचा दिग्दर्शकाचा विचार समजला तर आपल्यालाही त्या चित्रपटाचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेता येतो. लॉस अँजलीस येथील युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न क्यालिफ़ोर्नियाच्या सिनेमा स्कूलने या चित्रपटाचे प्रदर्शन आणि नंतर दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याबद्दल सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच.
कुठल्याही नव्या गोष्टीची निर्मिती झाल्यानंतर जेव्हा त्याची गोष्ट सांगितली जाते तेव्हा ती ऐकायला नक्कीच सुरस आणि चमत्कारिक वाटते. मग ती आपल्या आजोबांनी सांगितलेली 'आम्ही जेव्हा ४२ साली या बंगल्याची जागा विकत घेतली तेव्हा...' अशासारखी गोष्ट असेल नाहीतर भारतातल्या पहिल्या सिनेमाच्या जन्माची गोष्ट; दोन्ही तितक्याच सुरस, चमत्कारिक आणि नाट्यमय. 'राजा हरिश्चंद्र'च्या निर्मितीच प्रवास असाच नाट्यमय घडामोडींनी भरलेला आहे, आणि त्याची गोष्ट सांगणारा 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' हा चित्रपटही तसाच खिळवून ठेवणारा आहे. याची कथा सुरू होते १९११ सालात मुंबईमधे. धुंडिराज फाळक्यांनी नुकतंच आपल्या भागीदाराशी भांडण करून आपला जोरात चाललेला प्रिंटिंग प्रेसचा धंदा सोडून दिलाय. बरं सोडला तर सोडला, या महाशयांनी त्या गुजराथ्याला वर वचनही दिलंय की मी नवा प्रेस चालू करून तुला धंद्यात स्पर्धा उभी करणार नाही. माणूस प्रिंटिंग प्रेसच्या धंद्यात इतका वाकबगार की लोक स्वत:हून मागे लागलेत की आम्ही तुम्हाला भांडवल देतो, तुम्ही नवीन प्रेस टाका. पण फाळके ठिकठिकाणी जादूचे प्रयोग दाखवून घरखर्च भागवतायत. अशातच एक दिवस त्यांच्या पाहाण्यात येतो तंबूतला सिनेमा. पडद्यावरचे हलणारे फोटो बघून स्टिल फोटोग्राफीमधे तरबेज असलेल्या फाळक्यांच्या डोक्यात शिरतं की आपणही असे हलणारे फोटो बनवायचे (तेव्हा त्याला सिनेमा म्हणतात हेसुद्धा आपल्या इथे लोकांना ठाऊक नव्हतं). आणि त्या तंत्राबद्दल काहीही माहिती नसताना, जिद्दीने सगळी माहिती जमवून फाळक्यांनी 'राजा हरिश्चंद्र' कसा तयार केला ह्याची कथा खरोखरच खूप गमतीशीर आहे.
नवीन कुठलीही गोष्ट कोणी करत असेल, की त्याची प्रथम एक खूळ म्हणून संभावना होते. तशी ती फाळक्यांच्या सिनेमाचीही झाली. सिनेमाचं तंत्र शिकायला घरातलं सामानसुमान विकण्यापासून बायकोचे दागिने गहाण टाकण्यापर्यंत सगळं काही त्यांना करावं लागलं. सिनेमा कसा बनवायचा हे शिकवणारं इथे कोणी नव्हतंच. विलायतेहून मिळणारी मासिकं आणि पुस्तकं वाचून फक्त थेअरी समजली, प्र्याक्टिकलचं काय? मग ते शिकायला फाळके लंडनला गेले. अनोळखी देशात (तेही इंग्रजांच्या) फक्त सिनेमावर निघणार्या मासिकाचा पत्ता घेऊन पोहोचणं आणि सिनेमाचं तंत्र शिकणं ही कामं करावेत तर फाळक्यांसारख्या वल्लींनीच. नशीबानेही साथ दिली, वाटेत नव्या ओळखी होत गेल्या, लोक मदत करत गेले आणि फाळके सारं काही शिकून लंडनहून परत आले. सिनेमा काढायचा तर तो विलायती नाही तर भारतीय संस्कृती दाखवणारा आणि भारतीय मनाला रुचेल असा हे तर आधीच ठरलं होतं. विचार करता करता हरिश्चंद्र-तारामतीची कहाणी पक्की झाली. मग भांडवल जमवणे, कलाकार शोधणे वगैरे नाना अडचणींवर मात करत भारतातला पहिला सिनेमा तयार झाला. नुसता तयारच झाला नाही तर यशस्वीही झाला, पार लंडनमधे दाखवला गेला. या सगळ्या कामात दादासाहेबांना त्यांच्या पत्नी सरस्वतीबाईंची भक्कम साथ होती. फ़िल्म शूट झाल्यावर ती डेव्हलप करायचं, त्यासाठी लागणारी सगळी रसायनं हाताळायचं काम फाळक्यांनी सरस्वतीबाईंना शिकवलं. आणि त्यांनीही सगळ्या जबाबदार्या आनंदाने पार पाडल्या. हे सगळं सगळं 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' मधे खूप छान दाखवलंय.
या चित्रपटाचं मुख्य बलस्थान आहे चित्रपटाचा साधेपणा. अगदी पटकथेपासून संवादापर्यंत सगळं इतकं साधेपणे आपल्या डोळ्यांसमोर येतं की आपण चित्रपट पाहात नसून फाळक्यांच्या घरातच वावरतो आहोत असं वाटतं, इतके आपण त्याच्याशी समरस होऊन जातो. सगळ्या चित्रपटाला मोकाशींनी एक हलक्याफुलक्या विनोदाची ट्रीटमेंट दिली आहे त्यामुळे चित्रपट कुठेही रटाळ होत नाही. पटकथेची मांडणी अगदी साधी एका रेषेत 'अ' या ठिकाणाहून 'ब' या ठिकाणी जाणारी अशी आहे. कुठलेही फ्लॅशबॅक्स नाहेत की वळणं नाहीत. चित्रपटांचा असा प्रकार हाताळणं कौशल्याचं काम आहे. कारण पटकथा बांधीव नसेल तर एक तर सिनेमाची डॉक्युमेंटरी होते नाही तर उगाचच मेलोड्रामा होतो. मुळात चित्रपटाची तारीफ़ काय दाखवलंय याच्यापेक्षा काय दाखवायचं टाळलंय याच्यात आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणातही आजकाल न दिसणार्या स्टिल कॅमेरासारख्या तंत्राचा अत्यंत परिणामकारक वापर केला गेलाय. यात शूटिंग करताना कॅमेराची हालचाल फार कमी केली जाते, जणू काही क्यामेरा लावून ठेवलाय आणि पात्रं त्याच्या समोर ये-जा करतायत. त्यानंतर चित्रपटातले कलाकार - त्यांच्याबद्दल तर काय बोलणे? फिट्ट बसलेत सगळे आपापल्या भूमिकेत. विशेष कौतुक आहे ते दादासाहेब आणि सरस्वतीबाईंची भूमिका करणारे नंदू माधव आणि विभावरी देशपांडे यांचं. कलंदर वृत्तीचे दादासाहेब आणि त्यांना साथ देणार्या आणि सांभाळून घेणार्या सरस्वतीबाई दोघांनी झकास रंगवल्यात. कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाईंनी सेट्सद्वारे १९११-१२चा तो काळ छान उभा केलाय. तबला, हार्मोनियमसारख्या मोजक्याच पण भारतीय वाद्यांचा वापर करून दिलेलं आनंद मोडकांचं पार्श्वसंगीतही मस्तच.
हा सिनेमा पाहिल्यावर असं अजिबात वाटत नाही की परेश मोकाशींचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. जरी ते गेली वीसेक वर्षं नाट्यक्षेत्रात कार्यरत असले तरीही चित्रपट दिग्दर्शनाचं कुठलंही प्रशिक्षण न घेता बनवलेला हा सिनेमा बघताना 'साला या माणसाला पिच्चर काय चीज आहे हे समजलंय' हे जाणवतं. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या प्रश्नोत्तरांमधून या सिनेमाबद्दल, दादासाहेब फाळक्यांबद्दल अनेक रोचक गोष्टी समजल्या. दादासाहेब फाळके या माणसाने काय नाही केलं ते विचारा - त्र्यंबकेश्वरसारख्या खेड्यातून मुंबईत येऊन जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समधे शिकले, बडोद्याला कलाभवनमधे मूर्तीकला, ड्रॉईंग आणि फोटोग्राफी शिकले, नंतर राजा रविवर्मांच्या लिथोप्रेसमधे काम केलं, एका जर्मन जादूगाराकडून जादूचे प्रयोग शिकले, एक ना दोन अनंत गोष्टी. (श्री. बापू वाटवे यांनी लिहिलेलं दादासाहेब फाळक्यांचं चरित्र वाचायच्या पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे.) गंमत म्हणजे फाळक्यांप्रमाणेच मोकाशींनाही सिनेमासाठी पैसे स्वत: उभे करावे लागले. कारण अवघ्या ९५ मिनिटांचा हा सिनेमा, त्यात परत मराठीत. या सिनेमात एकही गाणं नाही. 'असा सिनेमा तुम्ही कसा बनवणार? सिनेमात गाणी टाका; प्रसिद्ध कलाकार घ्या; मराठीतून सिनेमा कोण बघणार? हिंदीत बनवा तर फायनान्स देतो' यासारख्या फायनान्सरच्या मागण्यांना बळी पडायचं नाही हे मोकाशींनी ठरवलं होतं. या सगळ्या अडचणींवर मात करून स्वत:च्या मनासारखा आणि एक अत्यंत उत्तम चित्रपट बनवल्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
हा सिनेमा आपली ऑस्करसाठीची यंट्री आहे. सिनेमाच्या ऑस्कर वारीसाठी तर माझ्या शुभेच्छा आहेतच. मराठी सिनेमा दिवसेंदिवस मोठा होत चाललाय याचंच हे लक्षण आहे. यूटीव्हीसारख्या मोठ्या कंपन्या मराठी चित्रपटाच्या वितरणाला पुढे येतायत ही अजून एक आनंदाची बाब आहे. युनिव्हर्सिटीतल्या त्या २०० आसनक्षमतेच्या लहानश्या थेटरात सगळ्या जागा भरून लोक मागे उभे होते. सिनेमा संपल्यावर उभं राहून जेव्हा सगळ्यांनी चित्रपटाला आणि परेश मोकाशींना टाळ्यांची दाद दिली तेव्हा एवढं छान वाटलं की बास. हा सिनेमा ऑस्कर मिळवेल की नाही मला ठाऊक नाही, पण जर पुढे एखाद्या मराठी सिनेमाला ऑस्कर मिळालंच तर त्या साडेआठ पौंडाच्या सोनेरी बाहुलीतलं एक गुंजभर ब्रिटॅनियम तरी हरिश्चंद्राच्या फॅक्टरीतून बाहेर पडलेलं असेल हे नक्की.
हरिश्चंद्राची फॅक्टरी
निर्मिती-कथा-दिग्दर्शन :- परेश मोकाशी
छायाचित्रण - अमलेंदु चौधरी
कला - नितिन चंद्रकांत देसाई
संगीत - आनंद मोडक
कलाकार - नंदू माधव, विभावरी देशपांडे, मोहित गोखले, अथर्व कर्वे आणि इतर.